लोणी काळभोर : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील शितळादेवी नगर परिसरात बंद घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2 लाख 86 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी 75 वर्षीय जेष्ठ नागरिकाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटले. त्यानंतर घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेली 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 86 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान, ही चोरी 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत झाली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(3), 331(4) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश पैठणे करीत आहेत.







