पुणे: आंबेगाव खुर्द परिसरात दहशत निर्माण करून गुन्हेगारी वर्चस्व टिकवण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्या कुख्यात गुंड आकाश थोरात आणि त्याच्या साथीदारांविरोधात अखेर ‘मोक्का’ म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये एकूण १२ जणांचा समावेश आहे. त्यात ६ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश भरत थोरात (वय ३२, रा. सच्चाईमाता मंदिर, आंबेगाव खुर्द) याच्यासह अजित अंकुश धनावडे (वय २४), आदित्य जालिंदर शिंदे (वय १८), रोहित बाळासाहेब कचरे (वय २१), आणि विशाल ऊर्फ मोड्या दीपक गणेचारी (वय २१) यांच्यावर ही कठोर कारवाई झाली आहे.

थोरात टोळीने स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करून आर्थिक स्वार्थासाठी गुन्हेगारी कारवाई सुरू केल्या होत्या. तपासात हे स्पष्ट झाले की, आकाश थोरात याने स्वतःच्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अल्पवयीन मुलांना गुन्ह्यांमध्ये सामील करून घेतले. या अल्पवयीन मुलांकडून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करवून घेण्यात आला होता. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला होता आणि उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची नोंद आंबेगाव पोलिस ठाण्यात झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास केला. तपासात थोरातच्या टोळीचे संघटित गुन्हेगारी नेटवर्क उघडकीस आले.
गेल्या १० वर्षांत आकाश थोरातवर १० गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्या टोळीने प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही गुन्हेगारी थांबवलेली नव्हती. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक झिने यांनी या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठवण्यात आला. आयुक्तांनी प्रस्तावास मंजुरी देत मोक्काअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी काहीसा दिलासा घेतला आहे. पोलिसांकडून पुढील तपास आणि टोळीतील इतर गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.









