पुणे : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, पुणे शहरात देखील चिंतेचे वातावरण आहे. पुण्यात गेल्या 24 तासांत 98 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अशातच आणखी एक नवी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहरातील सांडपाण्यात कोरोना विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून करण्यात आलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मे 2025 पासून शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधील नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू असल्याचे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवालात सांगण्यात आले आहे. अशातच आता नागरिकांना काळजीचे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे शहरातील 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधील पाण्याचे नमुने दर आठवड्याला तपासले जातात. या तपासणीत 40 ते 60 नमुन्यांचा समावेश असतो. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून या सर्व नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू आढळून आला आहे. तसेच मे महिन्यापासून सांडपाण्यात हा विषाणू सातत्याने वाढत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. अशातच पुणेकरांसाठी ही चिंतेची बाब असून, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.








