कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावर बकरी ईदनिमित्त कुर्बानी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला सशर्त परवानगीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात तातडीने हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची अप्रत्यक्षपणे मान्यता मिळाल्याचे मानले जात आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयाने ७ जून ते १२ जून या कालावधीत विशाळगडावर कुर्बानी करण्यास सशर्त परवानगी दिली होती. विशाळगड किल्ला हा ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील स्थळ असल्याने, येथे कुर्बानीला परवानगी दिल्याबद्दल काही संघटनांकडून तीव्र आक्षेप नोंदवला गेला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने, कुर्बानी करताना सार्वजनिक भावना दुखावणार नाहीत, स्वच्छतेच्या आणि कायद्याच्या अटींचे पालन होईल, अशा अटी लागू केल्या आहेत. या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि धार्मिक संघटना यांच्यात काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कायद्याच्या चौकटीत राहून कुर्बानी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाची एक तुकडी विशाळगडावर तैनात करण्यात येणार आहे.








