पुणे : वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीच कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. संतनगर येथील वीज उपकेंद्रातील या कथित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महावितरण प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. या प्रकरणात एका सहायक अभियंत्यासह 2 वरिष्ठ तंत्रज्ञांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सहायक अभियंता रोहन रमेश शिंगाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप काळे आणि रमेश हरिभाऊ मगर अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नगर रस्ता विभागाच्या विश्रांतवाडी उपविभागांतर्गत लोहगाव शाखेत संतनगर येथे 22/11 केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र आहे. 21 ऑक्टोबर 2026 रोजी या उपकेंद्रात संबंधित अधिकारी आणि तंत्रज्ञ ड्युटीवर असताना मद्यपान करत असल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले.

या घटनेची माहिती महावितरणशी संबंधित काही ठेकेदारांना मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकाराचे चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेत चौकशी सुरू केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निलंबनाचे आदेश
व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर संबंधित तिघांकडून गैरवर्तन झाल्याचे प्रशासनाने नमूद केले. त्यानंतर रास्ता पेठ येथील पुणे शहर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी तिघांच्या निलंबनाचे आदेश दिले. कर्तव्यावर असताना अशा प्रकारचे वर्तन करणे हा गंभीर शिस्तभंग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
वीज उपकेंद्रांमध्ये उच्च दाबाच्या विद्युत यंत्रणांचे संचालन आणि देखभाल केली जाते. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सतर्क राहणे आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक असते. अशा संवेदनशील ठिकाणी मद्यपानाचा प्रकार समोर आल्याने महावितरणच्या कामकाजातील शिस्त आणि सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.






