पुणे : वडिलांनी आईस्क्रीम फेकून दिल्याचा राग आल्याने मुलींनी आईच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
सतीन जाधव (वय. ५१) यांनी यासंबंधी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शामला जाधव (वय. ५३), स्नेहल अमोलिक (वय.३८) आणि तेजस्वी अमोलिक (वय.३४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता.२) रोजी घरी आले. त्यावेळ त्यांनी त्यांच्या मुलींना बाहेरून येताना आईस्क्रीम आणले होते. “मी ४ चपात्या खाणारा माणूस आहे या आईस्क्रीम ने माझे पोट भरणार नाही” असे जाधव सांगून त्यांनी आईस्क्रीम फेकून दिले.
दरम्यान, बाहेरून पैसे देऊन आणलेले आईस्क्रीम फेकून दिल्याचा राग त्यांच्या दोन्ही मुलींना आला. या दोन्ही मुलींनी त्यांच्या आईची मदत घेत वडिलांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आण त्यांचे डोके भिंतीवर जोरात आदळले. भिंतीवर डोके आदळल्यामुळे जाधव यांच्या मेंदूला जबर मार बसला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
यानंतर जाधव यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३२३, ३३७, ३३८ अंतर्गत त्यांच्या पत्नी आणि मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.