हडपसर : दुचाकीवरून चाललेल्या जोडप्याला काँक्रीट मिक्सरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना मांजरी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तुपे कॉर्नर जवळ असलेल्या खाऊ गल्ली समोर रविवारी (ता.4) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात त्या महिलेचा पती जखमी झाला आहे.
रेणु ब्रम्हशंकर पांडे (वय ३८, रा. केशवनगर, पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी ब्रम्हशंकर शिवप्रताप पांडे (वय ३९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कॉक्रीट मिक्सर वरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ब्रम्हशंकर पांडे हे त्यांची पत्नी रेणु यांना घेऊन त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त दुचाकीवरून चालले होते. दुचाकीवरून जात असताना, त्यांची दुचाकी मांजरी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तुपे कॉर्नर जवळ आली असता, त्यांच्या दुचाकीला काँक्रीट मिक्सरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रेणु पांडे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर फिर्यादी ब्रम्हशंकर पांडे हे जखमी झाले आहेत.
दरम्यान, अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील काँक्रीट मिक्सर हा वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवुन, या अपघातास व रेणु पांडे यांना गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्युस कारणीभुत झाला. अशी फिर्याद ब्रम्हशंकर पांडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चालकाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१,१०६ (१), व मोटार वाहन कायदा कलम १८४,११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले करीत आहेत.