शिरूर, (पुणे) : भाडे तत्वावर घेतलेल्या चारचाकी वाहनांच्या चालकास मारहाण करत जबरदस्तीने वाहने चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखा व रांजणगाव पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन वाहने व इतर साहित्य असा १३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विकास संतोष दानवे (वय – २१ वर्षे रा. जवखेडा ता. भोकरदन जि. जालना), भरत कडुबा हजारे (वय २४), विकी एकनाथ पाखरे (वय २६), सिताराम गंगाधर विर (वय २८, रा. तिघेही आप्पतगाव ता. जि. छत्रपती संभाजी नगर), सारंग काशिनाथ खाकरे, वय २४, रा. चिंचपूर ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर), शिवानंद महादेव दुधभाते (वय २६, रा. गारखेडा परीसर, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना छत्रपती संभाजीनगर परीसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर व रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा दिवसाच्या अंतरात चारचाकी कार मालकांना प्रवासाकरीता बाहेरगावी जायचे आहे, असे सांगून गाडी भाड्याने घेण्यात आली होती. काही अंतर पुढे गेल्यानंतर निर्जन ठिकाणी कार चालकास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल घेतला. तसेच त्याला रस्त्यात सोडून देत जबरदस्तीने कार चोरून नेल्याची तक्रार देण्यात आली होती.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना १५० सीसीटीव्हीचे फुटेज तपासले गेले. दोन्ही वाहने ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर एका खबऱ्याकडून सदरचे गुन्हेगार हे छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपी विकास दानवे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सदरचे गुन्हे केले असून ते सर्वजण छत्रपती संभाजी नगर येथे आहेत. तसेच दोन्ही वाहने त्यांच्याजवळ असून त्याचा ते वापर करत असल्याची खात्रीलायक माहिती दिली.
दरम्यान, मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवत त्यांनी दिलेल्या आदेशानुसार वरील सर्व आरोपींना छत्रपती संभाजीनगर शहरातून अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून इनोव्हा व स्विफ्ट डिझायर असा १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी विकास दानवे याच्यावर दरोडा व मारहाणीचे एकूण पाच, तर दुसरा आरोपी सिताराम वीर याच्यावर चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. आरोपींना न्यायालयाने गुरुवार (ता. ०७) पर्यंत पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास रांजणगाव पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, संजू जाधव, दगडू विरकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे, पोलीस अंमलदार दतात्रय शिंदे, अभिमान कोळेकर, विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी केलीआहे.