पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला असताना महाविकास आघाडी आणि महायुतीने जाहिरातींचा धडका लावाला आहे. अशातच एका जाहिरातीने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या एका जाहिरातीमध्ये ‘अनाजी’ असा उल्लेख केल्याने ब्राह्मण समाजाने तीव्र संताप व्यक्त करत यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
महाविकास आघाडीने आज (शुक्रवार) निवडणूक प्रचारासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये पूर्ण पान जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पहिल्या अनाजीने स्वराज्याला लुटले आणि दुसऱ्याने अवघ्या महाराष्ट्राचे व शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त केले’ असा उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे.
या जाहिरातीवर आता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आहे. यातून महाविकास आघाडीने ब्राह्मण समाजाच्या भावना दुखवाल्या आहे व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचे, महासंघाने म्हटले आहे.
‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने या जाहिरातीचा व महाविकास आघाडीचा तीव्र निषेध करतो. अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या जाहिरातींवर त्वरित बंदी आणावी व ही जाहिरात वृत्तपत्रांतून मागे घेण्यात यावी’, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष मंदार रेडे यांनी केली आहे.