Onion News :सोलापूर : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कारण, सरकरनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर कांद्याचे दर घसरले आहेत. अशातच सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे. बाजार समितीत सुमारे 1200 ते 1500 गाडी कांद्याची आवक झाली आहे. या वाढलेल्या आवकेमुळं दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
1200 ते 1500 गाडी कांद्याची आवाक झाली असली तरी अद्यापही अनेक गाड्या रांगेत थांबून आहेत. त्यामुळे आज सकाळी दहा वाजता सुरु होणारे कांद्याचे लिलाव दुपारी दोन वाजता करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. शनिवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीनं घेतला आहे. तर रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यानं सलग दोन दिवस बाजार समिती बंद राहणार आहे. आधीच निर्यातबंदीमुळं सोलापूरच्या बाजारात कांद्याचे दर निम्म्याहून अधिक घसरले होते. त्यातच वाढलेल्या आवकेमुळं दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी कसेबसे कांद्याच्या पिकाला जगवलं आहे. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याला कमी भाव मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल,असे आश्वासन मंत्री पियुष गोयल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकरी वर्गात पुन्हा नाराजी पसरली आहे. अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु आहेत.