कराड : सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये सकल मराठा समाजाकडून सोमवारी (30 ऑक्टोबर) मराठा आरक्षणासाठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कराड शहरातील दत्त चौकातून या विराट मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चाला कराड आणि संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव सहभागी होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. या मोर्चासाठी तालुक्यातील गावोगावी जनजागृती करण्यात आली आहे, त्यामुळे लाखोंच्या संख्येने मराठा समाज मोर्चाला उपस्थित राहातील असा देखील दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे. या मोर्चानंतर सकल मराठा समाज तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहे.
मोर्चाचा मार्ग कसा असेल?
कराडमधील दत्त चौकात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाणार. त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होईल. तिथून तो आझाद चौक मार्गे चावडी चौकात येईल. तिथून कन्या शाळा, जोतिबा मंदिर पासून हा मोर्चा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाणार.त्यानंतर महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कराड तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा येईल तिथेच सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले जाणार आहे.