पंढरपूर : देशभरात आज 78 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूरतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात देखील तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली.
पंढरपूरमधील विठुरायाची राऊळी स्वातंत्र्य दिनानिमित्त सजली आहे. मंदिरात विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली. देवाचे प्रवेश द्वार, चौखांबी, सोळखांबीसह मंदिरात फुलांची सजावट केली आहे. पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात.
सलग सुट्टी व श्रावण महिना असल्याने भाविकांची गर्दी झाली आहे. फुलांची आरास केल्याने विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. अशा या भक्ती रसात तीरंगी फुलांची आरास केल्याने देशप्रेमात देखील न्हाहून निघाला असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही.