पाचगणी : ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलने पाचगणी शहराच्या नावलौकिकतेला चालना मिळाली असून भूमिपुत्रांना व्यवसायाची संधी मिळाली आहे. यावर्षीच्या दिमाखदार सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मी निश्चित येईन, अशी ग्वाही सुप्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांनी दिली. यंदा २९ नोव्हेंबर ते एक डिसेंबरअखेर होणाऱ्या आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हलचे नगारे वाजू लागले आहेत. बंधुत्व, मैत्री आणि जिव्हाळा असा त्रिवेणी संगम घेऊन साजरा होणाऱ्या फेस्टिव्हल समितीचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. येथील पालिकेच्या स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर, सिने कलावंत, निर्माता दिग्दर्शक व फेस्टिव्हल समितीचे सदस्य अमीन हजी यांनी आमीर खान यांची फेस्टिव्हल समिती सदस्यांसमवेत भेट घेतली. समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी तीन दिवसांच्या सोहळ्याविषयी माहिती दिली.
गेल्या वर्षी समितीने प्रकाशित केलेल्या ‘आय लव्ह पाचगणी’ स्मरणिकेची प्रत यावेळी आमीर खानला भेट दिली. जुन्या आठवणी ताज्या करत आमीर खान म्हणाला, “सिनेकलावंत झाल्यानंतर मंगल पांडे, राजा हिंदुस्तानी अशा विविध विविध चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने हजर राहिलो. ‘तारे जमीन पर’च्या निमित्ताने न्यू ईरा हायस्कूल येथे बालचमूंच्या विश्वात रममाण होण्याचा आनंद मिळाला.” बालपणापासून मला पाचगणीची ओढ आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या याठिकाणी मी खेळलो, बागडलो, अनेक बाह्यचित्रीकरणात सहभागी झालो आहे. त्या आठवणी अजूनही माझ्या मनात रुजल्या आहेत. येथील निसर्ग मला नेहमीच भुरळ घालत असतो.
कला, क्रीडा, साहित्य अशा विविध कलाविष्कारांची मेजवानी घेऊन गेल्या आठ वर्षांपासून होत असलेल्या ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिव्हलच्या निमित्ताने पर्यटनवाढीला, शहराच्या नावलौकिकतेला चालना मिळाली आहे. आय लव्ह पाचगणी फेस्टिवल या स्मरणिकेत पाचगणी येथील निसर्गाच्या सानिध्यात बाह्यचित्रीकरण झालेल्या चित्रपटांची दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्याबद्दल कुतूहल व्यक्त करत जतन करण्यासारखा अप्रतिम ठेवा असल्याचे सांगत स्मरणिकेविषयी कौतुक केले.