करमाळा : करमाळासह तालुक्यातील जिंती- पारेवाडी, हिंगणी- केत्तूर, वांगी, सर्पडोह या सात गावांसह जिल्ह्यातील 54 गावे हातभट्टी तयार करण्यात हिटलिस्टवर आहेत, असे निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने1 एप्रिल 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या काळात जिल्ह्यातून तब्बल 60 हजार लिटर हातभट्टी आणि 12 लाख लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट केले आहे. ग्रामीण पोलिसांनीही अंदाजे तेवढाच मुद्देमाल जप्त केला. पण, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘हातभट्टीमुक्त जिल्हा’ आणि ग्रामीण पोलिसांकडून ‘ऑपरेशन परिवर्तन’ राबविले जात असतानाही जिल्ह्यात हातभट्टीची नशा वाढलेलीच आहे, हे या आकडेवारीतून स्पष्ट होते.
दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पहिल्यांदा जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन राबवून गावागावातील तरुणांना व्यसनाच्या आहारी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. पण, आता तेवढा प्रयत्न, कारवाईतील सातत्य दिसत नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते, पण त्यांची एवढी भीती अवैध व्यावसायिकांना नाही. त्यामुळे दोन्ही विभागांनी समन्वयातून आठवड्यातून किमान तीनवेळा धाडी टाकल्यास निश्चितपणे ‘ऑपरेशन परिवर्तन’ यशस्वी होईल.
जिल्ह्यातील 54 गावांमध्ये विशेषत: तांड्यांवर अवैधरीत्या हातभट्टी दारू तयार होत असल्याने ते हिटलिस्टवर आले आहेत. यामध्ये मोहोळ तालुक्यातील बेगमपूर व भांबेवाडी यासह माळशिरसमधील कुरभावी, गुरसाळे, धर्मपुरी, चांदापुरी, चंद्रपुरी, विजोरी, चव्हाणवाडी, सवतगव्हाण पारधी वस्ती, पिलीव तसेच सांगोल्यातील पाचेगाव खु. हतीद, वाकीशिवणे, महीम, चिकमहूद व महूद याठिकाणी हातभट्टी तयार होते. अक्कलकोटमधील कलकर्जाळ, कोर्सेगाव, तडवळ, मुंढेवाडी, बासलेगाव, नागोर तांडा, तर बार्शीतील भातंबरे तांडा, पंढरपुरातील देगाव, लक्ष्मी टाकळी व वाखरी याठिकाणी हातभट्टी तयार होते. दक्षिण सोलापुरातील तिल्लेहाळ, दोड्डी, उळेवाडी, गुरप्पा, मुळेगाव, वडजी, शिवापुढारी, सीताराम या तांड्यांसह बक्षिहिप्परगा व वरळेगाव तर उत्तर सोलापुरातील कोंडी, गुळवंची, तिऱ्हे, सेवालाल, कवठे, भोजप्पा व घोडा तांडा, खेड व शिवाजीनगर याठिकाणी हातभट्टी तयार होते.