सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आढेगावमध्ये आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या 14 वर्षीय मुलाचे नाव आहे. आज (दि. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील गणेश नष्टे हे सिमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. बंदुकीचे लायसन्स हे जम्मू काश्मीरचे आहे. वडिलांची घरातील बंदुक घेत खुर्चीवर बसून डोक्यात गोळी झाडून श्रीधरने आत्महत्या केली आहे. टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, खेळता खेळता ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीधर हा इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जिजामाता प्रशालेमध्ये आठवीत शिक्षण घेत होता. तो आजारी असल्याने घरीच होता. त्याला दवाखान्यात नेऊन तपासणी करून आणले होते. डॉक्टरांनी श्रीधरला विश्रांतीचा सल्ला दिला होता. सोमवारी त्याने अज्ञात कारणाने दुपारी घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज एकून घरातील आई, आजोबा धावत आले असता, तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. श्रीधर याचे वडील राजस्थानमध्ये सीमा सशस्त्र दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. सध्या तो आई, लहान भाऊ, आजी, आजोबा यांच्यासमवेत राहत होता. सदर घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे या करीत आहेत.