अकोला : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा आता लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच जवळपास सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. असे असताना महायुती असो वा महाविकास आघाडी यामध्ये अद्याप जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार जाहीर केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साद घालणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याची चाचपणी करत आहेत. वंचित बहुजन आघाडीने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी एका तृतीयपंथीयासह 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली.
त्यामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघातून तृतीयपंथीय शमिभा पाटील निवडणूक लढवणार आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही सिंदखेड राजा मतदारसंघातून सविता मुंढे यांना उमेदवारी दिली आहे. त्या वंजारी समाजाचा आहे. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेसाठी नोव्हेंबरच्या मध्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे’.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याशिवाय पक्षाने आघाडीतील घटक पक्ष असलेले भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी यांचे उमेदवारही जाहीर केले आहेत. सुनील गायकवाड (भाआपा) 10 – चोपडा (एसटी) मधून उमेदवार असतील. हरीश उईके (जीजीपी) 59 – रामटेक येथून उमेदवार असतील.
रविकांत तुपकर यांच्यासाठी ‘वंचित’चा प्रयत्न
मागील लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना तब्बल अडीच लाख मते मिळाली होती. तर एकट्या सिंदखेडराजा मतदारसंघात रविकांत तुपकरांना 30 हजार मतांची आघाडी होती. सोबतच बुलढाणा, मेहकर आणि चिखली मतदारसंघात तुपकरांना लक्षणीय मते होती.
तुपकर यांचे कार्यकर्ते, संघटन ‘अॅक्टिव्ह’
यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढले होते. तेव्हापासून राज्यातील 27 जिल्ह्यात रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते आणि संघटन सक्रिय झाल्या आहेत. तर दुसरीकडे तुपकरांशिवाय राज्यातील तिसरी आघाडी अपूर्ण असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातही होणार फायदा
रविकांत तुपकर आणि प्रकाश आंबेडकर हे दोन्ही नेते एकत्र आल्यास राज्यात एक नवे समीकरण पाहिला मिळू शकते. तुपकर आणि आंबेडकर एकत्र आल्यास याचा फायदा पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचेही म्हटले जात आहे.
…तर आम्ही विचार करू शकतो
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘राजू शेट्टींसोबत जी चर्चा झाली. ती तुमच्यासमोर मांडतो. वामनराव चटप राजुरामधून लढतात आणि गोंडवाना पार्टी देखील तिथून लढते. वामनराव चटप दुसऱ्या जागेवरुन लढणार असतील तर आम्ही विचार करु शकतो. आपण रिजनल पार्टीसंदर्भात बोललो तर ठीक आहे. लिस्ट आमच्याकडे आलेली आहे. बच्चू कडूंबरोबर आमचं जमू शकत नाही’, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.