नागपूर : हत्या, गोळीबार, खंडणी, अपहरणाबरोबरच शहरात दादागिरीचा प्रकार पुढे आला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. दोन गुंड एका चहाविक्रेत्याच्या दुकानात आले आणि ‘मै दुकान में आया की फटाक से चाय देना, और पैसे मांगनेका नहीं’ असे धमकावत चहाविक्रेत्यावर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. दादागिरी करणाऱ्या या गुंडाला पोलिसांनी अटक केली. सय्यद इरशाद उर्फ गुड्डू सय्यद अजीज (२६, रा. वनदेवीनगर, यशोधरानगर), असे आरोपीचे नाव आहे.
निसार खान अब्दुल कहन खान (५१, रा. वांजरा ले-आउट, वनदेवीनगर, यशोधरानगर) यांचे संतोषनगर चौकात चहाचे दुकान आहे. त्यांच्याच वस्तीत आरोपी सय्यद राहतो. त्याचा निसार खान यांच्या मुलाशी जुना वाद होता. गुरुवार, १७ एप्रिलला रात्री ८ वाजताच्या सुमारास सय्यद हा त्याच्या अन्य एका साथीदारासोबत निसार खान यांच्या चहाच्या दुकानात आला आणि ‘तेरा लड़का कहा है बे,’ अशी विचारणा केली. उगाच वाद नको म्हणून निसार खान जास्त काही बोलले नाही.
दादागिरी करणाऱ्या आरोपीला अटक
निसार खान घाबरल्याचे बघता सय्यदची हिंमत वाढली आणि त्याने दमदाटी करण्याचा प्रयत्न सुरू केला. ‘मै दुकान में आया की फटाक से चाय देना, और पैसे मांगनेका नही,’ असे म्हणून सय्यदने निसार खान यांच्यावर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. चाकूहल्ल्यात निसार खान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून यशोधरानगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हाटकर यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत सय्यदला अटक केली.