छत्रपती संभाजीनगर: एका महिला व लहान मुलीबाबत व्हाट्सॲपवर ग्रुपवर अभद्र व अश्लिल भाषेत टिप्पणी करणाऱ्या मांडवा (ता. वाशी जि. धाराशिव) येथील रहिवाशी व उस्मानाबाद जिल्हा परिषद शाळेचा निवृत मुख्याध्यापकास शुक्रवारी ( दि. १८) सकाळी मुंबई पोलिसांच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये सापळा रचून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या निवृत मुख्याध्यापकाचे नाव महबूब काझी (रा. मांडवा ता. वाशी जि.धाराशिव ह.मु. छत्रपती संभाजीनगर) असे आहे.
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार, निवृत मुख्याध्यापक महबूब काझी यांनी एका महिलेसह लहान मुलीवर अभद्र व अश्लिल भाषेत टिप्पणी केली होती. यानंतर दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी सदरील महिलेच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी महबूब काझी विरुद्ध बी. एन. एस.च्या विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु, सदरील गुन्ह्याच्या तपासात आरोपी महबूब काझी मुंबई पोलिसांना कोणतेही सहकार्य न करता फरार राहत असल्यामुळे त्यास शुक्रवारी (दि. १८) सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.