-अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी येथील दोन्ही गटातील वाद अधिकच वाढत चालल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष व संचालक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सुरेशराव लोणकर यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 च्या कलम 17 अन्वये यवतमाळ येथील सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी गुरुवारी (22 ऑगस्ट) संचालक पदावरुन काढून टाकण्यात आले आहे, असा आदेश पारित केला आहे. त्यामुळे घाटंजी तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
सदर प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती नितिन अशोक कोठारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपिल गुणवंत चन्नावार यांनी 2 फेब्रुवारी 2023 रोजी संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनीयमन) अधिनियम 1963 च्या कलम 17 अन्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे प्रकरण दाखल केले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी तर्फे ॲड. मंगेश गंगलवार यांनी काम पाहिले. तर उपसभापती सचिन देशमुख पारवेकर व इतर संचालकांकडून ॲड. सोनाली लाडेकर – गंगलवार यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ येथे वकीलपत्र दाखल केले आहे.
विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी येथील प्रकरण अगोदर यवतमाळ येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था येथे दाखल करण्यात आले. नतर विभागीय सहनिंबधक, सहकारी संस्था, अमरावती येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आले. सदर प्रकरण सध्या प्रलंबित आहे.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे व संचालक आशिष सुरेशराव लोणकर यांना कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनीयमन) अधिनियम 1963 चे कलम 17 मधील तरतुद तसेच शासन अधिसुचना (दि. 5 सप्टेंबर 1981) नुसार प्रदान अधिकाराचा वापर करून संचालक पदावरुन काढून टाकण्यात येत आहे, असा आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी गुरुवारी पारित केला आहे.
आदेशाच्या प्रती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नितीन अशोक कोठारी, सचिव कपिल गुणवंत चन्नावार व संबंधित संचालकांना बजावण्यात आले आहे. तर प्रतिलीपी म्हणून पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे, सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ मुख्य कार्यालय पुणे, विभागीय सहनिंबधक सहकारी संस्था अमरावती व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था घाटंजी (जि. यवतमाळ) यांना माहितीकरीता पाठविण्यात आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती नितिन कोठारी, सचिव कपिल चन्नावार यांनी व्यापा-यांशी असलेले आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनाचे निमित्त करून आमच्या विरूद्ध हेतुपुरस्सर व सुडबुद्धीने अपात्रेचा प्रस्ताव पाठविला होता. सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक यांनी राजकीय दबावाखाली अपात्रतेचा निर्णय दिल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे यांनी केला आहे. तथापि, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सुरेशराव लोणकर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
– अभिषेक शंकरराव ठाकरे, माजी सभापती व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती