मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी मुस्लिम समुदायाच्या हक्कांबद्दल चिंता व्यक्त करत वक्फ सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध व्यक्त केला आहे. आव्हाड म्हणाले की, हे विधेयक मुस्लिमांच्या हक्कांना कमकुवत करण्याचा आणि वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी यावर भर दिला की, वक्फ मालमत्ता सरकारच्या मालकीच्या नाहीत, “वक्फ मालमत्ता श्रीमंत मुस्लिमांनी त्यांची संपत्ती समुदायाच्या हितासाठी दान केली आहे ते त्यांच्या मालकीच्या आहेत,” असे आव्हाड म्हणाले. “सरकारने या मालमत्तांचे संरक्षण करावे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांचा वापर समुदायाच्या कल्याणासाठी केला जाईल याची खात्री करावी.” वक्फची जमीन कुणाचीही जमीन नाही. या जमिनी दानात दिल्या गेलेल्या जमिनी आहेत. राजे-महाराजांच्या जमिनी आहेत. त्या वक्फ झाल्या आहेत.
आपल्याकडे काही सातबारे विठ्ठलाच्या नावावर, काही पांडुरंगाच्या नावावर, काही रामाच्या नावावर. या देवस्थानांच्या जमिनी आहेत. अर्थात महाराष्ट्रात देवस्थानाच्या जमिनी खाल्ल्याचेही प्रकार महाराष्ट्रात घडले यावर कोणी प्रश्न चिन्ह उपस्थित नाही केले. आव्हाड यांनी वक्फ मालमत्ता आणि हिंदू मंदिरांच्या मालकीच्या मालमत्तांबद्दल बोलतांना सांगितले की, सरकारने सर्व धार्मिक समुदायांच्या हक्कांचा आदर केला पाहिजे. “आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन असलेली मंदिरे आहेत आणि त्यांच्या मालकीवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. वक्फ मालमत्तांना वेगळे का वागवावे?” असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला. मुस्लिम संघटना आणि समुदाय नेत्यांमध्ये वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर या विधेयकाला आव्हाड यांनी विरोध आहे, ज्यांना भीती आहे की, याचा गैरवापर होऊ शकतो . वक्फ दुरुस्ती विधेयकाचे उद्दिष्ट वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करणे आहे, परंतु टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की, यामुळे सरकारी हस्तक्षेप होऊ शकतो आणि मुस्लिम समुदायाच्या हक्कांचे नुकसान होऊ शकते.