श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दारू प्यायला जाता, तर ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका, असे सांगितल्याचा राग आल्याने एकाने पत्नीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिचा निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे बुधवारी (दि. १८) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकाराबद्दल श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शिवनाथ कारभारी भवर यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुशीलाचा भाऊ मल्हारी हरिभाऊ दरंदले यांनी फिर्याद दाखल केली. सुशिला शिवनाथ भवर (वय 32, रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर) असं खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिवनाथकडे क्रमांक नसलेला ट्रॅक्टर आहे. त्याला दारूचे व्यसन असून त्याची पत्नी सुशीला पतीला दारू पिण्यास कायम विरोध करत असे. त्यामुळे शिवनाथ तिला नेहमी मारहाण करत असे. तो बुधवारी (दि. १८) रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास घरासमोर उभा केलेला ट्रॅक्टर घेऊन गावामध्ये दारू पिण्यासाठी निघाला होता. तेव्हा पत्नी सुशीला ट्रॅक्टरसमोर आडवी झाली.
शिवनाथने दारू प्यायला जाताना ट्रॅक्टर नेऊ नये, असे ती सांगत होती. मात्र शिवनाथने ट्रॅक्टर चालू करून थेट तिच्या अंगावर घातला. ट्रॅक्टरखाली चिरडली गेल्याने ती बेशुद्ध पडली. तिचे सासरे सीताराम वाल्नीराम भवर यांनी तिला तातडीने श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.