Mumbai News : मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. मराठा आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये आरक्षणासंदर्भात भूमिका मांडावी. गरज पडल्यास आधी मंत्र्यांनी आणि नंतर महाराष्ट्रातील खासदारांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केले.
आधी मंत्र्यांनी आणि नंतर महाराष्ट्रातील खासदारांनी राजीनामे द्यावेत
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण आणि आमदार अपात्रतेच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्राची कॅबिनेट बैठक होईल तेव्हा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा कॅबिनेटमध्ये मांडावा. (Mumbai News) पंतप्रधानांवर या सर्व गोष्टींचा परिणामच होणार नसेल, तर सर्व ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा. एकजूट दाखविण्याची हीच वेळ आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी या वेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू असताना मराठा आरक्षणासाठी उपसमितीची बैठक झाली, त्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाला आहे. (Mumbai News) तर दुसरे उपमुख्यमंत्री पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात फिरत होते. आपले राज्य जळत आहे, याच्याशी यांचा काडीचाही संबंध नाही.
उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना विनंती केली की, राज्यात आंदोलनाला हिंसक वळण मिळत आहे. जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांना महाराष्ट्रला बदनाम करण्याचे राजकारण करायचे आहे. (Mumbai News) पाटील, तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका. कारण हा लढा जिवंत ठेवण्यासाठी तुमच्यासारख्या लढाऊ बाण्याच्या व्यक्तीची राज्याला गरज आहे. तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा.