बीड: बीड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर ते फोटो पाहून नैराश्येत जाऊन केज तालुक्यातील जाणेगाव येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.अशोक हरिभाऊ शिंदे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर केजमध्ये बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये अशोक शिंदे यांनी सहभाग घेतला होता. तिथून घरी आल्यानंतर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पुण्यात राहणाऱ्या बहिणीला फोन करून हळहळ व्यक्त केली होती. तेंव्हा मला टोकाचा पाऊल उचलावासे वाटत आहे, असे त्याने फोनवरून बहिणीला सांगितले. त्यानंतर बहिणीने समजूत काढूनही अशोक शिंदे यांनी मंगळवारी(4 मार्च) गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर धनंजय देशमुख यांनी कोणीही असे टोकाचे पाऊल उचलून नये असे म्हटले आहे. ज्या लोकांमुळे वाईट घटना घडली, त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण सर्वांनी सोबत राहायचे आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.