पुणे: पुणे महानगर पालिकेच्या सिंहगडरोड येथील क्षेत्रीय कार्यालयातील बिगारी सेविकेने 2000 रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका 46 वर्षीय पुरुषाने सिंहगड पोलिसस्टेशन येथे फिर्याद दिली होती. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सेविकेवर कारवाई केली आहे. छाया जातेगावकर (कुकडे) असे लाच मागणाऱ्य सेविकेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, तक्रारदारांचे वडील दि. 8 जुलै 2012 रोजी मयत झाल्याने, त्यांच्या राहत्या घराच्या मालमत्तेवर कर संकलन विभाग, सिंहगडरोड क्षेत्रीय कार्यालय, महानगरपालिका, पुणे येथे वारसदार नोंदणी करण्याकरिता लोकसेवक छाया जातेगावकर (कुकडे) यांनी तक्रारदाराकडे 200 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. या बाबत दि. 24 जानेवारी 2025 रोजी तक्रारदार यांनी लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दिली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सदर प्रकारणाचा तपास पोलिस निरीक्षक विजय पवार लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केला. दि. 27 जानेवारी 2025 रोजी लोकसेवक छाया जातेगावकर (कुकडे) यांच्याकडे पंचासमक्ष पडताळणी केली असता, त्यांनी तक्रारदाराचे काम करण्यासाठी 2000 रुपयांची लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले. या बरोबरच तडजोडीअंती ” शासकिय फी ” व्यतिरिक्त 1000 रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्याने, आज दि.(5 मार्च 2025) रोजी लोकसेवक छाया जातेगावकर (कुकडे), बिगारी सेवक यांच्या विरुद्ध सिंहगडरोड पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.रं.नं. 133/2025 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, सन 1988 चे कलम 7, 7(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केले आहे.
१) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
२) व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७००
३) ई-मेलआयडी पुणे [email protected]
४) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in
५) ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in