जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. याचदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली होती. तेव्हा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी त्यांना धारेवर धरले होते. त्यावरून आता जरांगे पाटलांनी नारायण राणेंना इशारा दिला आहे. ‘ते जर असं काही बरळत असतील तर मी पुढच्या वेळी त्यांना सोडणार नाही’, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्याला जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘मला काही मर्यादा असल्याने मी शांत आहे. माझी निलेश राणे यांना विनंती आहे की, नारायण राणे यांना समजवा. कारण पुढच्या वेळी मी त्यांना सोडत नसतो. मी तुम्हाला नाही, तुमच्याबद्दल चकार शब्द काढला नाही. मग तुम्ही कोणाची री ओढताय? मोदींना ओबीसी असल्याचा अभिमान आहे. तसाच मला मराठ्यांचा अभिमान आहे. उगाच काहीही बोलायला तुम्ही एकटेच तीनसिंगराव लागून गेलात का?’ असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘कोण आहे, काय आहे, किती मोठा माणूस आहे असलं काही मी बघणार नाही. मी नारायण राणेंचा, त्यांच्या वयाचा आदर करतो. ते मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला आमच्याकडून डाग लागणार नाही, याची आम्ही काळजी घेतो. तुम्ही आमची भावना समजून घ्या. अन्यथा मी त्यांचा पाणउतारा करेन. त्यांना खेटायचंच असेल तर माझीही तयारी आहे.’