Maratha Reservation : पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत उलटल्यानंतरही आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याने पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. यामुळे आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिस्थितीची जाणीव सर्वांनाच आहे. यामुळे आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे मत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आरक्षण देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आरक्षण देण्याच्या निर्णयावर ठाम
अब्दुल सत्तार म्हणाले की, ओबीसी समाजाच्या भावना लक्षात घेऊन कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्यात येणार आहे. योग्य निर्णयासाठी संयम ठेवणेच योग्य ठरेल. सरकार प्रत्येक मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. नेत्यांना गावबंदी करू नका. हा पर्याय नाही. (Maratha Reservation) राजकारणात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, असेही अब्दुल सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाचे नेते आहेत. शिवरायांची शपथ घेऊन ते सांगतात तेव्हा शंका घेण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही पक्षाचे उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य आहे. मोठा भाऊ मराठा समाज असेल तर लहान भाऊ हा ओबीसी आहे हे देखील विसरता येणार नाही, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदे गटाचा आहे. त्यामुळे शिंदे गटाचे महत्त्व कमी केले जाते, ही वस्तुस्थिती नाही. जनतेची सेवा करण्यावर त्यांचा भर आहे. अजित पवार आम्हाला सन्मानाने वागवतात, असंही ते म्हणाले. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, अध्यक्षांनी आम्हाला आजची तारीख दिली आहे. (Maratha Reservation) कोणताही निर्णय घेताना लोकशाहीप्रमाणे होईल. आमची भावना वैयक्तिक ऐकणार नाही, तोपर्यंत ते योग्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.