रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद पार पडली. ठाकरे गटातील आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा दावा यावेळी पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत यांनी केला. उद्यापासून याची सुरूवात होईल असे ते सांगितले. त्याशिवाय शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णयाचा पूणरूच्चार सामंत यांनी केला. श्रीकांत शिंदे यांच्या हॅट्रिकचा विश्वास व्यक्त करत उदय सामंत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
14 तारखेपासून काय होतंय ते पाहा
“14 तारखेपासून काय होतंय ते पाहा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार आहेत”. असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला. यावेळी त्यांनी मिलिंद देवारा यांचा उल्लेख केला. त्यांच्या पक्षप्रवेशावरही मत व्यक्त केलं.
मिलिंद देवरा शिवसेनेत येणार का?
“मिलिंद देवरा यांच्यासाऱख्या नेत्याची एकनाथ शिंदे यांना साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना भक्कम होईल. त्यांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांच्या विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा. सहकारी म्हणून देवरा यांचा चेहरा मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीने वाढेल”, असे उदय सामंत म्हणाले. “मिलिंद देवरा लोकांमध्ये जावून काम करणारे नेतृत्व आहे. मुरली देवरा साहेबांचा त्यांना वारसा आहे. अनेक माजी आमदार त्यांच्यासोबत काम करतात,” असेही सामंत म्हणाले.
महाविकास आघाडीवर हल्लाबोल
“ज्या महाविकास आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही त्यांचा आम्ही विचार करत नाही. पहिले त्यांनी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 10 ते 20 टक्के मतदान घेणारा चेहरा त्यांनी जाहीर करावा. ते सैरभैर झालेत कारण यांच्याकडे पंतप्रधानांचा चेहरा नाही”, असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले.