Jayant Patil : आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एका जागेची उमेदवारी जाहीर केली आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चिपळूणमधून प्रशांत यादव निवडणूक लढतील, अशी घोषणा केली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार राजेश टोपे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हणाले, आम्ही एक-एक मतदारसंघ हाताळत आहोत. चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी लढणार आहे, त्यासाठी प्रशांत यादव यांचा चांगला चेहरा आहे. कोकणात आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातुन दूध पाठवतो पण प्रशांतने स्वतः डेअरी उभी केली आहे. ती डेअरी दिपस्तंभाप्रमाणे उभी असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणची जागा निवडून आणली होती. सगळ्या परिस्थितीचा विचार करता राज्याचं राजकारण सगळ्यांनी अनुभवल आहे. शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री असताना अनेकवेळा कोकणाला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील तसेच कोकणातील शेतकरी कायम शरद पवार यांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहिला आहे.
जयंत पाटील यांनी सांगितले की, चिपळूण विधानसभा मतदारसंघातील प्रशांत यादव यांनी आपल्यासोबत काम करायचं ठरवलं आहे. चिपळूणची जागा विजयी झालो होतो. मात्र, खेडची जागा थोडक्यात गेली, तर गुहागरच्या जागेवर भास्कर शेठ आमदार आहेत. वादळ आलं, संकट आलं की पवार साहेबांनी कोकणाला मदत केली, कोकणाचा विकास आहे, तो कृषीमंत्री असताना जे जे निर्णय झाले ते पवार साहेबांच्या उपस्थित घेतले गेले आहेत, असही जयंत पाटील यावेळी म्हणाले.