पुणे: मार्केटयार्डमधील फुलबाजारात सात ते आठ तृतीय पंथीयांनी शेतकऱ्याशी वाद घालून अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी (दि. १८) घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बाजारात एक शेतकरी फुलांची विक्री करत असताना तिथे सात ते आठ तृतीयपंथी आले. त्यांनी संबंधित शेतकरी विकत असलेली फुले फुकट उचलण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला विरोध करत शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले की, या मालाची किंमत जास्त आहे. तुम्हाला माझ्या परीने पैसे देतो. मात्र, हे तृतीय पंथी काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी थेट शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. तसेच अतिशय बीभत्स वर्तन करत शेतकऱ्याला शिवीगाळ केली. त्यांचे वर्तन पाहून यावेळी फुले खरेदीसाठी आलेल्या महिला देखील खजील झाल्या. या सात ते आठ तृतीय पंथीयांचे वर्तन हे खंडणी मागणाऱ्या लोकांसारखे होते.
दरम्यान पुण्यातील मार्केटयार्डमध्ये ग्रामीण भागातूनअनेक शेतकरी भाजीपाला तसेच फुले विक्रीसाठी आणत असतात. पहाटेपासूनच येथे मालाची विक्री सुरू असते. असंख्य प्रमाणत शेतकरी येथे येत असतात, गेल्या अनेक दिवसांपासून तृतीय पंथी शेतकऱ्यांकडून प्रती दहा रुपये प्रमाणे पैसे मागत असतात. न दिल्यास गलिच्छ भाषेत शिवीगाळ करतात. कोणताही शाप नको या भावनेतून गुपचूप हा त्रास शेतकरी सहन करून पैसे देऊन टाकतात. खासकरून फुलबाजारात पैसे न मागता शेतकऱ्याचा माल उचलून नेण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. साधारण पहाटेच्या सुमारास हजारो शेतकरी असतात. त्यानुसार कमीतकमी दहा हजार रुपयाची मोठी लूट केली जाते.

शेतकऱ्यांनी ही बाब मार्केट कमिटीच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी देखील कानाडोळा केला असल्याचे दिसते. तर जवळच पोलीस स्टेशन असून त्यांचे देखील लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या तृतीय पंथीय वर्गाची हप्तेगिरी तसेच दादागिरी त्वरित थांबवावी, अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे. शेतकरी वर्गाचा विचार करून मार्केट कमिटीने देखील पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कारवाई कोण करणार?
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत फुले, कांदा तसेच भाजीपाला लिलावासाठी आलेल्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून तृतीय पंथीयांचा त्रास सहन करावा लागत आहे. हे तृतीयपंथी शेतकऱ्यांकडून बळजबरीने पैसे अथवा माल घेत आहेत. या संबंधित तृतीयपंथीयांवर कारवाई बाजार समिती करणार की पोलीस? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या घटनेविषयी बोलताना शंकरबापू कड देशमुख म्हणाले की, ”रविवारी फुलबाजारात सात ते आठ तृतीय पंथीयांनी शेतकऱ्याचा माल फुकट उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकऱ्याने मालाची किंमत जास्त असल्याने विरोध केला. तसेच तृतीय पंथीयांना प्रति दहा रुपये प्रमाणे पैसे देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यांनी ही बाब मान्य न करता शेतकऱ्याशी वाद घालून शिवीगाळ करत बीभत्स वर्तन केले. तसेच शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी एकत्र अशा विकृत गोष्टींना विरोध करायला हवा.”
ज्या व्यक्त्त सोबत हा प्रकार घडला आहे, तो शेतकरी नसून आडत्या आहे. पोलिसांना सांगून देखील ते कारवाई करत नाहीत. तसेच झालेल्या प्रकाराबाबत तृतीयपंथी संघटनेच्या प्रमुखाला बोलावून समज देण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा संबंधित संघटनेला बाजार समितीकडून देण्यात आला आहे.
दिलीप काळभोर, सभापती- पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.







