छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी परिसरात (चॅनेल क्रमांक ४२६) महाराष्ट्र शासनाच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वाहनाची समोरील काच फुटली. सुदैवाने वाहनातील पाचही जण सुखरूप बचावले. मात्र, घटनेनंतर ११२ क्रमांकावर तीन वेळा फोन करूनही मदत मिळाली नाही, असा आरोप वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कार्यालय अधीक्षक हिंमत राठोड यांनी केला आहे.

राठोड हे आपल्या सहकाऱ्यांसह शासकीय बैठकीसाठी वाशिमहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यांच्यासोबत बैठकीसाठी आवश्यक कागदपत्रेही होती. प्रवासादरम्यान सावंगी परिसरात त्यांच्या शासकीय वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. यात वाहनाच्या समोरील काचेचे नुकसान झाले. मात्र, वाहनातील पाचही जणांना कोणतीही दुखापत झाली नाही.
घटनेनंतर महामार्ग पोलिसांचे पथक २० मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ११२ या आपत्कालीन क्रमांकावर तीन वेळा फोन करूनही मदत मिळाली नाही आणि दोन तास प्रतीक्षा करूनही संबंधित पथक आले नाही, असा आरोप राठोड यांनी केला आहे. अखेर तक्रार नोंदवण्याबाबत सूचना मिळाल्यानंतर ते शासकीय बैठकीसाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

या घटनेनंतर सुमारे २० तासांनी पोलीस आयुक्तांसह तीन पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. ११२ क्रमांकावर केलेला कॉल नेमका कुठे गेला, पोलिसांचे पथक किती वेळात घटनास्थळी पोहोचले आणि हल्ला नेमका कसा झाला, याची माहिती घेतली जात आहे. या प्रकरणावर पोलिसांकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
समृद्धी महामार्गावर गेल्या सहा महिन्यांत दगडफेकीच्या आठ आणि लुटमारीच्या पाच घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आता थेट शासकीय वाहनावरच दगडफेक झाल्याने महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.






