पुणे : दूध, दही, तेल, पनीर आणि मसाल्यांनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हेल्थ सप्लिमेंट्स म्हणजेच पोषक पूरक पदार्थांच्या विक्रीवर कडक लक्ष केंद्रित केले आहे. यापुढे या उत्पादनांची विक्री करताना एफडीएच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल, असा नवा आदेश जारी करण्यात आला आहे. तुकाराम मुंढेच्या या निर्णयामुळे बेकायदेशीरपणे सप्लिमेंट्स विकणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अनेकदा सप्लिमेंट्समुळे कोणताही आजार बरा होतो किंवा वजन झटपट कमी होते, असे खोटे दावे केले जातात. तसेच डॉक्टरांनी मान्यता दिल्याचे भासवून दिशाभूल केली जाते. सोशल मीडियावर रिल्स किंवा पोस्टद्वारे चुकीची जाहिरात करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सवर कठोर कारवाईचा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. चुकीची जाहिरात केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. परवाना नसल्यासही 10 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येईल. याशिवाय, अशा पदार्थांमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधिताला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या मेडिकल दुकाने, जिम, फिटनेस सेंटर्स आणि इतर अनेक ठिकाणी हेल्थ सप्लिमेंट्स सहज उपलब्ध होतात. मात्र, यापुढे जिथे जिथे अशी उत्पादने विकली जातील, तिथे अन्न परवाना (फूड लायसन्स) असणे अनिवार्य राहील. विक्रेते आणि पुरवठादारांकडून अनेकदा नियमांचे उल्लंघन होते आणि गैरवापर वाढत असल्याचे समोर आले आहे.

हेल्थ सप्लिमेंट्स आणि न्यूट्रास्युटिकल्सचा उद्देश केवळ दैनंदिन आहाराला पूरक राहणे आणि आरोग्य टिकवून ठेवणे हा आहे; कोणतीही कमतरता दूर करणे किंवा आजार बरा करणे हा नव्हे. त्यामुळे पॅकेजिंगच्या लेबलवर संपूर्ण माहिती देणे गरजेचे आहे. त्यात वापरलेल्या वनस्पतींचा तपशील, योग्य मात्रा, संभाव्य परिणाम आणि दुष्परिणाम स्पष्टपणे नमूद करावे लागतील. तसेच ‘लहान मुलांपासून दूर ठेवा’ आणि ‘दररोज वापर टाळा’ अशा सूचना लिहिणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये वाढती मागणी पाहता हे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.







