पुणे : मद्यविक्री अथवा मद्यपानासाठी आवश्यक असलेला FL-III परवाना नसतानाही हॉटेलमध्ये ग्राहकांना सर्रास मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या खराडी परिसरातील तीन हॉटेलांवर पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-2 आणि खराडी पोलिसांनी संयुक्त छापे टाकले. या कारवाईत एकूण 58 ग्राहक मद्यपान करताना आढळून आले. तसेच हॉटेल मालक आणि वेटर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांचे पथक 21 नोव्हेंबर रोजी खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाची सोय केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खराडी पोलीस ठाण्याच्या रात्रपाळीतील सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी यांना माहिती देऊन पोलिसांनी संबंधित हॉटेलांमध्ये तपासणी केली.
पहिली कारवाई राजमुद्रा हॉटेलमध्ये करण्यात आली.
हॉटेलचा मालक संजय तुळशीराम बोराटे (वय 53, रा. चंदननगर, पुणे) आणि वेटर संजय खंडू पातोडे (वय 34, रा. राजाराम पाटीलनगर, खराडी) हे विनापरवाना ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून मद्यपान करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे आढळले. यावेळी मद्यपान करणाऱ्या 20 ग्राहकांकडून मद्याच्या बाटल्या तसेच हॉटेलच्या काउंटरवरील रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई हॉटेल निवांत येथे करण्यात आली. हॉटेलचा मालक गुलाब दादा खरात (वय 32, रा. राजाराम पाटीलनगर, खराडी) हा विनापरवाना ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे पोलिसांना आढळले. या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या नऊ ग्राहकांकडून मद्याच्या बाटल्या आणि मद्यविक्रीतून मिळालेली रोख रक्कम जप्त करण्यात आली.
तिसरी कारवाई हॉटेल फर्माइश आणि हॉटेल तंदूर टक्का येथे करण्यात आली. फर्माइश हॉटेलचा मालक अंकुश हेमराश वाघमारे (वय 34) आणि वेटर हेमराज भिस्त (वय 55), तसेच तंदूर टक्का हॉटेलचे मालक ऋषी संदीप झांबरे (वय 24), प्रणय मोहन देवकर (वय 27) आणि वेटर रवींद्रकुमार सेने (वय 28) हे विनापरवाना ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे आढळले. या दोन्ही हॉटेलांतील मद्यपान करणाऱ्या 29 ग्राहकांकडून मद्याच्या बाटल्या आणि काउंटरवरील रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही कारवायांमध्ये एकूण 58 ग्राहक मद्यपान करताना आढळले असून, संबंधित हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 68 नुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-3) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक नितिनकुमार नाईक, अफरोज पठाण, पोलीस उपनिरीक्षक संदिप कोतकर, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, अख्तर शेख, संदिप देवकाते, योगेश कुंभार, शरद धांडे, सतिश चव्हाण, अमोल मुंढे, तुषार साळुंके, रेडके, किरण जाधव, लोणकर, निलेश जाधव, शेख, धारुडकर, सुरेखा साबळे, सुकेशिनी आंबले, जान्हवी सुर्यवंशी, अजिंक्य जोजारे अंमली पदार्थ विरोधी पथक 2. गुन्हे शाखा, पुणे शहर तसेच, सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी, पोलीस अंमलदार नाणेकर, पाटील, गजरमल, जाधव, केदारी व कोद्रे खराडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी संयुक्तरित्या केली आहे.






