लोणी काळभोर : जिद्द, मेहनत, कलासाधना आणि गुरूंचे मार्गदर्शन यांच्या जोरावर लोणी काळभोरच्या दोन चिमुकल्या नृत्यांगनांनी थेट अंदमान-निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथे आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ आणि ऑफिशियल पार्टनर युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोळाव्या ओलंपियाड स्पर्धेत भरतनाट्यम नृत्यप्रकारात लिशा जगदीश कलाल आणि कायरा गोयल यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, लिशा कलाल हिच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिला ग्लोबल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

पोर्ट ब्लेअर येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या सांस्कृतिक स्पर्धेत देशातील विविध भागांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विविध वयोगटांत आणि कलाप्रकारांत झालेल्या या स्पर्धांमध्ये भरतनाट्यम नृत्यप्रकाराने विशेष लक्ष वेधून घेतले. पारंपरिक भारतीय नृत्यकलेचा वारसा जपत दोन्ही विद्यार्थिनींनी आपल्या नृत्यातून ताल, लय, मुद्राभिनय, पदन्यास आणि भावभावनांचा सुंदर मिलाफ सादर केला. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. अखेर परीक्षकांनी त्यांच्या कलेला प्रथम क्रमांकाची दाद दिली.
लिशा कलाल ही नेहा अकॅडमीची विद्यार्थिनी असून, कायरा गोयल ही एमआयटी शाळेत शिक्षण घेत आहे. दोघींनीही कमी वयात नृत्यकलेची आवड जोपासत सातत्याने सराव आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. लिशा कलाल हिला मिळालेला ग्लोबल अवॉर्ड हा तिच्या कलाप्रवासातील विशेष गौरव मानला जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि त्यासोबत जागतिक स्तरावरील सन्मान मिळाल्याने तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या दोन्ही विद्यार्थिनींना प्रसिद्ध नृत्यगुरू नेहा भांडवलकर यांचे मार्गदर्शन लाभले. नृत्याचे बारकावे, शास्त्रीय नृत्याची शिस्त, भावाभिव्यक्ती आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यासाठी त्यांनी विद्यार्थिनींना सातत्याने मार्गदर्शन केले. गुरूंच्या मार्गदर्शनाला विद्यार्थिनींच्या कठोर परिश्रमांची जोड मिळाल्यानेच हे यश शक्य झाले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आजच्या आधुनिक युगात पाश्चात्त्य कलाप्रकारांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल असताना या चिमुकल्या नृत्यांगनांनी भारतीय शास्त्रीय नृत्यकलेची परंपरा जपत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ कुटुंबीय आणि शाळेचाच नव्हे, तर लोणी काळभोर आणि संपूर्ण हवेली तालुक्याचाही गौरव वाढला आहे. लिशा कलाल आणि कायरा गोयल यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच लोणी काळभोर पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही कला, संस्कृती आणि नृत्य क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे.






