लोणी काळभोर: जिद्द, चिकाटी आणि अफाट सहनशक्तीच्या जोरावर लोणी काळभोरच्या वैभव तुकाराम लाड याने ॲथलेटिक्सच्या धावपट्टीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. बोईसर (जि. पालघर) येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत तृतीय क्रमांक पटकावत त्याने कांस्यपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, 1500 मीटरच्या शर्यतीतही पाचवे स्थान मिळवत वैभवने दुहेरी यश संपादन केले आहे.

बोईसर येथील TAIPS 3 आणि 4 कॉलनी मैदानावर या ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित इंग्लिश मीडियम स्कूल, लोणी काळभोरच्या 17 वर्षांखालील मुलांच्या गटातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वैभवने आपल्या वेगवान धावण्याने, दमदार कामगिरीने आणि शेवटपर्यंत हार न मानण्याच्या वृत्तीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
3000 मीटरच्या शर्यतीत प्रतिस्पर्ध्यांशी अखेरपर्यंत कडवी झुंज देत वैभवने तिसरे स्थान पटकावले. त्याच्या या कामगिरीमुळे कांस्यपदकाची कमाई झाली. तर 1500 मीटरच्या शर्यतीतही त्याने पाचवे स्थान मिळवत आपली गुणवत्ता आणि सातत्य सिद्ध केले. नियमित सराव, खेळातील शिस्त, मेहनत आणि जिद्द यांचेच हे यश असल्याचे मानले जात आहे.

वैभवच्या या यशामुळे लोणी काळभोरच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याच्या यशाचे वृत्त समजताच शाळा, शिक्षक, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैभवचे संस्थेचे सचिव व प्रशासक एस. एम. गवळी, स्थानिक सल्लागार मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्णिमा शेवाळे, क्रीडा विभागप्रमुख तथा पी. टी. शिक्षिका प्रिया सरकार आणि शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. तसेच भविष्यातही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.






