पुणे : शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका विशेष बैठकीत मुळशी धरणातून पुण्यासाठी 8 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा मंजूर करण्यात आला आहे. पुण्याच्या झपाट्याने विस्तारणाऱ्या सीमा आणि वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई टाळण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

सध्या राज्यात ‘एल निनो’च्या परिणामामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळी परिस्थितीचे सावट आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पासह इतर प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे महापालिकेला पाणी कपातीसारखे आणि बचतीचे विविध मार्ग अवलंबावे लागत आहेत. दुसरीकडे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण आणि बांधकामे सुरू असल्याने लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या संपूर्ण परिसराला जादा पाण्याची तातडीची गरज भासत होती.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्याच्या पाणीप्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे. या बैठकीत मुळशी धरणातील 8 टीएमसी पाणी कोट्यावर शिक्कामोर्तब झाले असून, शहराच्या इतर प्रलंबित विषयांवर आगामी बैठकीत चर्चा केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

हा पाणीसाठा मंजूर झाला असला तरी, प्रत्यक्ष पाणी पुण्यात पोहोचण्यासाठी पुढील 1.5 ते 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे. धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र मोठी जलवाहिनी टाकणे, जॅकवेल उभारणे आणि नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधणे आवश्यक आहे. या सर्व तांत्रिक कामांसाठी प्रशासनाला एक सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा लागेल. या मोठ्या पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करावी लागणार असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच पुणेकरांची पाण्याची चिंता कायमची मिटणार आहे.







