पुणे : रस्त्यावर हॉर्न वाजवण्याच्या लहानशा कारणावरून ड्युटीवर असलेल्या एसटी चालकाला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी आरोपींवर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना दिले आहेत.

या घटनेवर प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत असे म्हटले कि,प्रवाशांची ने-आण करण्यासाठी एसटीचे चालक आणि वाहक ऊन, पाऊस, थंडी आणि रात्रंदिवस मेहनत करतात. या कर्मचाऱ्यांना कोणीही कमजोर समजू नये आणि त्यांच्यावर हल्ला करू नये, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.एसटी कर्मचारी एकटे नाहीत; महामंडळ आणि मी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत, असे मंत्री म्हणाले.तसेच असा प्रकार घडल्यास कर्मचाऱ्यांनी न घाबरता किंवा दबावाला बळी न पडता थेट एसटी मुख्यालयाशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना सर्व मदत मिळेल असेही सरनाईक यांनी म्हटले आहे
पुढे ते म्हणाले,कर्मचाऱ्यांचा मान आणि सुरक्षितता धोक्यात आणणारी कोणतीही दादागिरी सहन केली जाणार नाही.गणवेशात शासकीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारणे म्हणजे केवळ व्यक्तीवर हल्ला नसून, सरकारी व्यवस्थेच्या सन्मानावर आणि कायद्यावर घाला आहे. यामुळे इतर चालक-वाहकांचे धैर्य कमी होते. सार्वजनिक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या कर्मचाऱ्यांची सुरक्षा गरजेची आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर मारहाण, सरकारी कामात अडथळा आणणे आणि इतर योग्य कलमांखाली गुन्हे नोंदवावेत, असे स्पष्ट आदेश सरनाईक यांनी पोलिसांना दिले आहेत.

एसटी चालक आणि वाहक हे सार्वजनिक वाहतुकीचा कणा आहेत. त्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना, धमकावणाऱ्यांना किंवा हात उचलणाऱ्यांना कायद्याची भीती वाटणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.






