पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेसाठी पात्र ठरलेल्या १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांची पहिली यादी सहकार विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. ही यादी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळू शकणार आहे.

या योजनेमध्ये कर्जमाफी, एकवेळ समझोता (ओटीएस) आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन घटक आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफी घटकाची अंमलबजावणी करण्यात आली. त्याअंतर्गत एकूण २५.८१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या २०.७२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १८ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
एकवेळ समझोता योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या दोन लाख रुपयांवरील कर्जाच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी लागणार आहे. त्यानंतरच शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी बँकांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे संगणकीय संस्करण करून १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ओटीएसअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी परिशिष्ट ‘अ’मध्ये, तर बँकनिहाय यादी परिशिष्ट ‘ब’मध्ये देण्यात आली आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँकेचे नाव, बँक शाखा, विकास संस्थेचे नाव, कर्जखाते क्रमांक, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, ओटीएसनुसार थकबाकीची रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम यांचा समावेश आहे.
पात्र शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीतील तपशील तपासून ओटीएसनुसार त्यांच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एकाच बँकेत कर्जखाते असलेल्या शेतकऱ्यांनी यादीमध्ये नमूद केलेली रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा करायची आहे. एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही एका कर्जखात्यात ही रक्कम जमा करता येणार आहे.
मात्र, संबंधित खात्यात ओटीएसनुसार बँकेला देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी जमा केलेल्या रकमेची माहिती संबंधित बँकेकडून पोर्टलवर अद्ययावत केली जाणार आहे. ही माहिती दर शुक्रवारी पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. शेतकऱ्याने भरावयाची रक्कम जमा केल्याची खातरजमा झाल्यानंतर आणि थकबाकीची माहिती अद्ययावत केल्याच्या तीन दिवसांनंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.






