रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील कुंभे आणि देवकुंड या ठिकाणी असंख्य पर्यटक येत असतात. अशीच एक मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटेंट असेलेली २७ वर्षीय तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत या ठिकाणी आली होती. यावेळी निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरू ३०० फूट खोल दरीत पडली. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आनवी कामदार (वय-२७) असं या तरुणीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (16 जुलै) कुंभे येथे घडली.
नेमकं काय घडलं?
आनवी कामदार ही तरुणी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर इंस्टाग्राम रिल्स बनवण्यासाठी आली होती. मंगळवारी, सकाळी ९ च्या सुमारास कड्याच्या टोकावरील अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरून ती ३०० फूट खोल दरीत पडली.
दरम्यान, तिच्या मित्र मैत्रिणींनी ही माहिती माणगांव पोलीस स्थानकात दिली. माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचावपथक देखील घटनास्थळी पोहचले. दुपारी १ च्या सुमारास बचावकार्य सुरु करत १५ मिनिटातच तरुणीला बाहेर काढून माणगांव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
यावेळी माणगांवचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार व पोलीस सहकारी तसेच माणगांव तहसीलदार विकास गारुडकर व महसूल चे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कुंभे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.