नवी मुंबई : ट्रेलरमधून पोकलेन उतरवत असताना चालकाचे पोकलेनवरील नियंत्रण सुटल्याने घाबरून पोकलेनमधून खाली उडी मारणाऱ्या चालकाच्या अंगावर सदर पोकलेन पडल्याने सदर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी उरणमधील करळ सोनारी फाटा येथील रेल्वेच्या साईटवर घडली. या अपघाताला स्वतः पोकलेन चालक जबाबदार असल्याचे आढळून आल्याने न्हावा-शेवा पोलिसांनी त्याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात मृत झालेल्या पोकलेन चालक अजयकुमार मंगर महातो (२८) हा मूळचा झारखंड राज्यातला असून, सध्या तो वहाळ गाव येथे राहत होता. तसेच तो पोकलेन चालक म्हणून काम करीत होता. गत बुधवारी उरणमधील करळ सोनारी फाटा येथील जासईकडे जाणाऱ्या ब्रिजलगत सुरू असलेल्या रेल्वेच्या साईटवर पोकलेनचे काम असल्याने त्याठिकाणी ट्रेलरमधून पोकलेन नेण्यात आला होता. या वेळी अजकुमार हा ट्रेलरवरून पोकलेन खाली उतरवत असताना पोकलेनवरील त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पोकलेन ट्रेलरवरून खाली पडणार याची अजयकुमार याला चाहुल लागताच त्याने पोकलेनमधून खाली उडी मारली. मात्र याचवेळी ट्रेलरवरील पोकलेन अजयकुमार याच्या अंगावर पडल्याने त्याच्याखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. न्हावा शेवा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.