पुणे : गेल्या काही दिवसांपासून बीड प्रकरणी रडारवर असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. माजी कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याच उघड केलं. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना नुकतीच नाशिकच्या जिल्हा न्यायालयांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ऍक्टिव्ह मोडवर आले असून त्यांनी या दोघांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं अशी मागणी केली आहे.
भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्टमंत्र्यांची टोळी बनली असल्याचा सणसणीत आरोप त्यांनी केला आहे.धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना केलेल्या घोटाळ्याचा दररोज पर्दाफाश होत आहे. मुंडे यांच्या भ्रष्ट कारभाराने महाराष्टाच्या नावाला कलंक लागला आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. यातून काही बोध घेऊन तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना बरखास्त करायला हवे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची धमक नाही. तात्काळ त्यांनी मंत्रिमंडळातून दोघांनाही बरखास्त करावं असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पुढे बोलताना भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोपी केले आहेतभारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्टाचार करुन जनतेच्या पैशाची लुट करत आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करत असताना राज्यातील मंत्री मात्र कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही. या दोन्ही भ्रष्टमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.