लोणी काळभोर, ता 17: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ( Chhaava Chatrapati Sambhaji Maharaj ) जीवनावर आधारित छावा (Chhaava) चित्रपटाला राष्ट्रप्रेमी प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. त्यातील प्रत्येक प्रसंग लोकांना भावतो आहे. शेवटच्या बलिदानाच्या प्रसंगी तर प्रेक्षक ढसढसा रडत आहेत. मात्र ज्या जागेवर संभाजी महाराजांचे बलिदान झाले, ती जागा आजही अनेकांना माहीत नाही.
पूर्वीचा बहादूरगड आणि आताचा धर्मवीरगड (Dharmveer Gadh) पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर (६२ मैल) अंतरावर आहे. जवळचे शहर दौंड आहे. हा किल्ला भीमा नदीच्या उत्तरेकडील दौंड शहराच्या पूर्वेस सुमारे १५ किलोमीटर (९.३ मैल) अंतरावर पेडगाव या गावात आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना ( Chhaava Chatrapati Sambhaji Maharaj) संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने अकलूजला असलेली छावणी पेडगावला याच आणली. हा भुईकोट किल्ला आहे. याच किल्ल्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान झाले. ज्या खांबाजवळ त्यांचे हौतात्म्य झाले तो खांब आजही या किल्ल्यात पाहण्यास मिळतो.
याच ठिकाणी मराठ्यांचा छावा असलेल्या संभाजीमहाराजांनी औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याला धर्मवीर काय असतो, देशनिष्ठा आणि धर्मनिष्ठा काय असते? मुघलांसमोर न झुकणारा एक स्वाभिमानी मराठा राजा कसा असतो, हे दाखवून दिले होते. याच किल्ल्यात त्यांच्यावर तब्बल २९ दिवसपर्यंत पराकोटीचे अत्याचार करण्यात आले. मात्र मराठ्यांचा छावा तरीही खंबीर राहिला आणि त्याने कुठलेही धर्मपरिवर्तन स्वीकारण्याऐवजी हौतात्म्य स्वीकारले. आता या गडाला धर्मवीरगड म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या या किल्ल्याची दुरावस्था झालेली असून येथील अनेक वास्तू मोडकळीस आलेल्या आहेत.
गडाचा असा आहे इतिहास
मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. १६७२ मध्ये दख्खनेतील मुघल सेनापती बहादूर खान (औरंगजेबाचा दुधभाऊ) आणि त्याचा मामा याने येथे तळ ठोकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. बहादूरखानाने या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले.
अशी आखली विरोधात मोहीम
यानंतर त्याच्या विरुद्ध स्वराज्यात पेडगावची मोहिम आखली गेली आणि त्या मोहिमेचे प्रमुख सरदार होते स्वतंत्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या सोबत होते अनाजीपंत, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे व त्यांचा मुलगा संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी नाईक व त्यांचा साथीदार नंदी इ. या पेडगाव मोहिमेचा खरा उद्देश होता तो त्या बहादूर खानाने लुटून आणलेले हिंदू देव-देवता त्याच्याकडून परत आणायचे.
त्यात होता मोरगावचा मयुरेश्वर, कुरकुंभ गावची ग्रामदेवी फिरंगाईदेवी, आणि अनेक मंदिरांचे कळस इ. या मोहिमेत सरसेनापतींनी ९,००० सेनेच्या दोन तुकड्या केल्या होत्या, त्यापैकी स्वतःसोबत त्यांनी २,००० सेना आणि बाकिची ७,००० सेना ही येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे आणि मोरोपंत पिंगळे यांना दिली होती.
आणि पेडगाव मराठ्यांच्या ताब्यात आले
त्यांनी पेडगाव लुटायचा बेत आखला होता तो असा बहादूरगडच्या मुख्य दरवाजावर त्यांची ७,००० सेना उभी केली आणि त्यांना आदेश दिला कि बहादूरखानाची सेना आली तर उलट जंगलात पळायचे म्हणजे इकडे त्यांना देव परत आणायला वेळ मिळेल आणि अशाप्रकारे हंबीररावांची सरसेनापती म्हणून पहिली मोहिम फत्ते झाली. आत औरंगजेबाचा दुमजली महाल आहे. १७५९ मध्ये पेडगाव हे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी ताब्यात घेतले आणि ते १८१८ पर्यंत मराठ्यांकडे राहिले.