क्राइस्टचर्च : न्यूझीलंड येथील खेळपट्टीवर, डॅरिल मिचेल व अॅलन मिले यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी पुन्हा नांगी टाकल्याने भारत ४७. ३ षटकात सर्वबाद २१९ धावा केल्या. यामुळे न्यूझीलंडसमोर ५० षटकांत केवळ २२० धावांचे लक्ष्य असणार आहे.
येथील मैदानावर सुरु असलेल्या लढतीत भारतीय संघाचा डाव पुन्हा एकदा कोसळताना दिसला. सलामीवीर शिखर धवन व शुभमन गिल यांनी भारताला ३९ धावांची सलामी दिली. धावफलकावर ३९ धावा लागल्या असताना शुभमन गिल १३ धावा करुन परतला. त्यानंतर शिखर धवन देखील २८ धावा करत तंबूत दाखल झाला.
त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने ५९ चेंडूत ४९ धावा करताना भारताची पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. श्रेयसने आपल्या खेळीत ८ चौकार लागले. मात्र दुसऱ्या बाजूने सातत्याने फलंदाज हजेरी लावून परतत होते. रिषभ पंत (१२), सूर्यकुमार यादव (६) हे देखील स्वस्तात परतले.
वाशिंग्टन सुंदरने धडाकेबाज फलंदाजी करताना ५१ धावांची खेळी ५ चौकार व एका षटकाराने सजविली. मात्र त्याला तळाचे फलंदाज साथ देऊ शकले नाहीत. दीपक हुडा व दीपक चहरने प्रत्येकी १२ धावा केल्या.
भारताच्या २१९ धावांमध्ये २१ धावा आवांतर मिळाल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी तब्बल १३ वाईड, ८ लेग बाईजच्या धावा दिल्या. यामुळेच भारताला किमान २०० धावांचा टप्पा पार करता आला.
न्यूझीलंड संघाकडून डॅरिल मिचेल व अॅलन मिले यांनी भेदक गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन गडी बाद केले. त्यांना टीम साऊथीने २ तर लॉकी फर्गसन व मिचेल सेंटनरने प्रत्येकी १ गडी बाद करताना सुरेख साथ दिली.
न्यूझीलंडने १३ षटकांत नाबाद ७९ धावा करताना दमदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडला विजयासाठी ३७ षटकांत केवळ १४१ धावांची आवश्यकता आहे.