हडपसर : येथील २५ वर्षीय तरुणाने विवाहितेवर हांडेवाडी (पुणे) परिसरातील एका लॉजवर तब्बल ११ महिने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबूकवरून मैत्री करणे हे या विवाहितेला चांगलेच महागात पडले आहे.
अतुल अशोक इंदलकर (वय २५, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय विवाहित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल इंदलकर आणि फिर्यादी यांची फेसबुक या सोशल मीडियावरून जानेवारी २०२२ मध्ये ओळख झाली होती. ओळखीतून त्या दोघांची मैत्री झाली. आरोपी अतुल इंदलकर याने फिर्यादी महिलेला हांडेवाडी येथे भेटण्यासाठी बोलाविले. हांडेवाडी परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
आरोपीने फिर्यादी यांच्या अर्धनग्न अवस्थेतील फोटो देखील काढून घेतले होते. त्यानंतर आरोपीने त्या क्षणांचे फोटो फिर्यादी यांच्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देऊन वारंवार भेटण्यासाठी बोलावले आणि हांडेवाडी येथील लॉजवर आणि फिर्यादी यांच्या घरी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ देखील केली. सदर प्रकार हा जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे, असे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी आरोपी अतुल इंदलकर यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.