पुणे : कार बिघडूनही ”फास्टर ड्रायव्हर ट्रॉफी” पुण्याच्या निकिता टकले-खडसरेने पटकाविली आहे. कार नादुरुस्त होऊनही जिद्दीने स्पर्धेत यश मिळविल्याने निकिताचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेत निकिताने एकूण ”चार ट्रॉफी” पटकाविल्या आहेत.

इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२२ वेस्ट झोन क्वालिफाईड राऊंड यांच्या वतीने नानोली (पुणे) येथे फास्टर ड्रायव्हर स्पर्धेचे आयोजन २६ व २७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारताच्या वेस्ट झोन व बेंगलोर, हैदराबादसह ५० ते ६० कार रायडर सहभागी झाले होते.

या स्पर्धेत अतिशय निष्णात अनुभवी ड्रायव्हर सहभागी असताना नवख्या निकिता टकले खडसरेने पहिल्याच दिवशी फास्टर ड्रायव्हर या गटात पहिली ट्रॉफी पटकावली. या ट्रॉफीसह विविध राउंड मध्ये आणखी तीन ट्रॉफी मिळविल्याने तिचे कौतुक होत आहे. एफएमएससीआय च्या आयोजकांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली.
स्पर्धेचा दुसरा दिवस मात्र निकितासाठी खूप खडतर होता. कारण पहिल्या दिवशीच्या राऊंडनंतर गाडी बंद पडल्याने व स्पर्धा खेडेगावात असल्याने त्या ठिकाणी गाडीचे पार्ट व मेकॅनिक उपलब्ध न झाल्याने स्पर्धेत पुन्हा सहभागी होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
परंतु नाउमेद न होता इतर गाड्यांचे पार्ट टाकून कार सुरू केली. परंतु गाडी दुरुस्त झाली नाही तरी पुन्हा सहभागी होत निकिताने एक ट्रॉफी पटकावली. पहिल्या दिवशी फास्टर ड्रायव्हरसह तीन ट्रॉफी पटकविल्या.
याबाबत बोलताना निकिता म्हणाली, या यशाचे श्रेय ती वडील उद्योजक नितीन टकले, पती शुभम खडसरे, कुटुंबीय व तिचे मार्गदर्शक चेतन शिवराम यांना देते. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होत यश मिळवीत असताना मुख्य लक्ष जागतिक स्तरावरील मोटर रॅलीमध्ये (डब्ल्यू.आर. सी.) मध्ये सहभागी होऊन भारताचे नाव जगाच्या नकाशात कोरण्याचा संकल्प मी केला आहे.
तसेच दोन ते पाच डिसेंबर रोजी इंडियन नॅशनल चॅम्पियनशिप (के 1000) आयोजित केली आहे. यामध्ये सहभागी होणार आहे या स्पर्धेत सहभागी होऊन पहिली ट्रॉफी जिंकण्याचा मानस निकिताने व्यक्त केला.





