माऊंट मौनगानुई : भारताच्या सूर्यकुमार यादवने दमदार फलंदाजी करताना भारताला न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीत निर्धारीत २० षटकांत ६ बाद १९१ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, विजयासाठी १९२ धावांची गरज असताना न्यूझीलंडची सुवात देखील अडखळत झाल्याने ही लढत रंगतदार होणार असल्याची चिन्हे आहेत.
माऊंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या लढतीमध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली. ईशान किशन व यष्टीरक्षक रिषभ पंत यांनी भारतासाठी सलामीवीरांची भूमिका निभावली.
परंतु रिषभ पंतला याचा फायदा उचलता आला नाही. धावफलकावर ३६ धावा लागल्या असताना लॉकीं फर्गसनने रिषभ पंतला ६ धावांवर बाद केले. आश्वासक सुरुवातीनंतर ईशान किशनला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
ईशान किशनने ३१ चेंडूत ५ चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने ३६ धावांची खेळी केली.
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या ‘स्टाईल’ने फलंदाजीला सुरुवात केली आणि न्यूझीलंडचे गोलंदाज सैरभर व्ह्यायला सुरुवात झाली.
सूर्यकुमार यादवने केवळ ५१ चेंडूत ११ चौकार व तब्बल ७ षटकार मारताना नाबाद १११ धावांची दमदार खेळी केली. एका बाजूने सूर्यकुमार यादवची बॅट तळपत असताना बाकी फलंदाज केवळ मैदानावर हजेरी लावण्यासाठी येत होते. श्रेयस अय्यर व कर्णधार हार्दिक पंड्याने प्रत्येकी १३ धावांची खेळी केली.
दीपक हुंडा व वाशिंग्टन सुंदर यांना भोपळा देखील फॊडता आला नाही. शेवटी भावनेश्वर कुमारने अजून संघाची पडझड होऊ दिली नाही. न्यूझीलंड संघाकडून टीम साऊदीने ३, लॉकीं फर्गसनने २ तर ईश सोधीने एक गडी बाद केला.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, न्यूझीलंडने ५. षटकांत १ बाद ३० धावा केल्या होत्या. सध्या डेव्हन कॉन्वे व कर्णधार केन विल्यमसन फलंदाजी करत आहेत.