राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी यवत ग्रामपंचायतीच्या वतीने आज काळभैरवनाथ मंदिर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
काळभैरवनाथ मंदिर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन
आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. आरक्षणासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा, लाक्षणिक उपोषण यासाठी सर्वजण जमलो असून, आरक्षणाबाबत चर्चा करून यापुढे सगळ्यांनी जरांगे यांच्या मागे उभे राहू, अशी अपेक्षा सरपंच समीर दोरगे यांनी व्यक्त केली. मराठा महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सरपंचांना सूचना केल्या. मनोज जरांगे पाटलांच्या केसाला धक्का लागला तरी शासन कोणतेही असू द्या, महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. (Yavat News ) स्वतःची आई नारळपाणी घेऊन आली, तरी त्यांनी पाणी देखील घेतले नाही. त्यांच्यासाठी आपला समाज असाच एकजूट राहिला पाहिजे. आरक्षण तर मिळणारच आणि आरक्षण द्यावेच लागणार.
मराठा समाजाला जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळणार याचा विश्वास आहे. मराठा समाजासाठी आतापर्यंत कोणीच आवाज उठवला नाही. पुढील दोन दिवस वाट पाहून जर कोणताही निर्णय न झाल्यास एक दिवस गाव बंद करायचे नियोजन करणार असल्याचे उपसरपंच सुभाष यादव यांनी सांगितले. (Yavat News ) या वेळी मराठा महासंघाचे दादा माने यांनी या विशेष ग्रामसभेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण, राजकीय नेत्यांना गाव बंदी, प्रभात फेरी, कॅण्डल मोर्चा याबाबत ठराव मांडले. याला विशेष ग्रामसभेत एकमुखाने मंजुरी देण्यात आली. (Yavat News ) तर अण्णा दोरगे यांनी यापुढे गावात कोणत्याही नेत्याचे फ्लेक्स लावणार नाही असा ठराव मांडला असता, याला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. या वेळी कुंडलिक खुटवड, दिलीप यादव, श्रीपती दोरगे, अरविंद दोरगे, उमेश दिवेकर, सीमा दिवेकर, अशोक दोरगे, राहुल दोरगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मेहता परिवाराच्यावतीने युवराज मेहता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अनिल गायकवाड, झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने दत्ता डाडर, मुस्लिम समाजाच्या वतीने मोहसीन तांबोळी यांनी मराठी आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिला. (Yavat News ) मराठा समाजाला आरक्षण अस्तित्वासाठी नको तर पुढच्या पिढीसाठी हवे आहे. मुलांना शाळेत गेल्यावर कळतं की जास्त गुण मिळूनही आरक्षण नसल्याने आपण मागे राहतो. आरक्षण मुलांच्या शिक्षणासाठी हवे असल्याची भावना हर्षदा वरूडकर या तरुणीने व्यक्त केली.
यवत ग्रामपंचायतीने बोलावलेल्या विशेष ग्रामसभेसाठी मराठी समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल व गाव बंदीसाठी व्यापारी वर्गाचे सहकार्य लाभत असल्याबद्दल आभार व्यक्त करत विशेष ग्रामसभा संपल्याचे सरपंच समीर दोरगे यांनी जाहीर केले. ग्रामसभेनंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : सहजपूर येथे अपंगांसाठी ब्लॅंकेट वाटप अन् स्नेहभोजन
Yavat News : मासे पकडू देत नाही म्हणून, मिरवडीत एकाला लोखंडी रॉडने मारहाण