राहुलकुमार अवचट
यवत : ब्रह्म ऐक्य परिषदेचे आयोजक बाजीराव धर्माधिकारी व अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर परळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी केतकी चितळे यांनी केलेल्या भाषणात ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर कसा होतो, याबाबत विवेचन केले होते. ज्यामध्ये कोणतेही असंवैधानिक वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ठरतो. तत्काळ हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी पुणे शहरातील सर्व ब्राह्मण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून केली.
राज्यात विविध ठिकाणी ब्राह्मण समाजाविरुद्ध जातीय द्वेषातून होणाऱ्या घटनांकडे पोलीस विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली. ब्राह्मण समाजाला संपवण्याची भाषा केली जाते, त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे; परंतु सदर आरोपीस कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे. न्यायालयात योग्य बाजू मांडावी, अशी विनंती देखील या वेळी करण्यात आली.
या वेळी परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे, आम्ही सारे ब्राह्मण पाक्षिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, परशुराम सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस ऋषिकेश सुमंत, ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ईशानी जोशी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे चंद्रशेखर कुलकर्णी, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे मदन सिन्नरकर, सचिन वसगडेकर, सुनील कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.