पुणे : कुख्यात ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयातील कैद्यांच्या कक्षात उपचार सुरू होते. त्यावेळी पाटीलवरच्या उपचाराची जबाबदारी ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे होती. पुणे पोलिसांनी केलेल्या चौकशीत डॉ. ठाकूर यांनीच पाटीलवर उपचार करताना जाणीवपूर्वक विलंब केल्याचे निष्पन्न झाले होते. आता डॉ. ठाकूर यांनी दिलेल्या जबाबातून या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
डॉ. ठाकूर यांनी ललित पाटीलवर उपचार करण्याच्या नावाखाली त्याचा ससून रुग्णालयातील मुक्काम जास्तीत जास्त वाढेल यासाठी मदत केल्याचे जबाबातून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर ललित पाटीलला त्याच्या टोळीसह ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवताना अटक केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्याचे पित्ताशयाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉक्टर संजीव ठाकूर यांनीच घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या ऑपरेशनसाठी एक्स-रे काढताना ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता.
ललित पाटील पळून गेल्यानंतर या प्रकरणात अनेकांवर संशयाची सुई वळली होती. त्यात महत्वाचे नाव डॉ. संजीव ठाकूर यांचे होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर संजीव ठाकूर यांनी माध्यमांशी बोलणे टाळले होते. मात्र, आमदार रविंद्र धंगेकर ज्यावेळी ससून रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आणि ललित पाटील प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेले, त्यावेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर धंगेकर यांनी संजीव ठाकूर यांच्याकडे सगळी माहिती मागितली असता ही माहिती देण्यासदेखीस टाळाटाळ केल्याचे समोर आले होते. त्यामुळे डॉ. ठाकूर यांच्यावरील संशय अधिक बळावला.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने डॉ. ठाकूर यांचा आतापर्यंत तीन ते चार वेळा जबाब नोंदविला. ललितला नेमक्या कोणत्या आजाराने ग्रासले होते. त्याचे विश्लेषण करण्यात आले का? त्याच्यावर कोणते उपचार करण्यात आले, तसेच उपचारास विलंब का झाला? याबाबतची माहिती पोलिसांना जबाबातून मिळाली. डॉ. ठाकूर यांनी उपचारास विलंब करून ललितचा ससूनमधील मुक्काम वाढविला. पाटील याला रुग्णालयातून पसार होण्यासाठी अप्रत्यक्षपणे सहाय केले, असे डॉ. ठाकूर यांच्या जबाबातून निष्पन्न झाले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
ससूनमधील कैदी उपचार कक्षातून (वॉर्ड क्रमांक १६) ललित पाटील साथीदारांच्या मदतीने अंमली पदार्थांची विक्री करत होता. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी ससूनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सापळा लावून ललितच्या साथीदाराकडून दोन कोटी ३२ लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर डॉ. ठाकूर यांनी ललितच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले होते. ललितवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर लगोलग शस्त्रक्रिया निश्चित कशी करण्यात आली, यामागचे कारण पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.
ललित पाटील प्रकरणात डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविला आहे. डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास डॉ. ठाकूर यांना अटक होण्याची शक्यता आहे.
ललित पाटील ससूनमधून पसार झाल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. संजय मरसाळे यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात झाली होती. यापूर्वी येरवडा कारागृहातील समुपदेशकाला गुन्हे शाखेने अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन पोलीस कर्मचारी, कारागृहातील दोन कर्मचारी, तसेच ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यासह २० जणांना अटक करण्यात आली आहे. डॉ. ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले आहे.