गणेश सुळ
Wagholi News : वाघोली : नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ म्हणजे ‘मामाचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’. मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरचा दुवा होता. माहेरुन ख्याली-खुशाली सांगणारं त्याकाळचं ते १५ पैशांचं पोस्टकार्ड हा जगण्याचा घटक होता आणि तो पत्र आणणारा पोस्टमन आपल्या घराकडे कधी येतो याची सर्वांजण वाट पाहत बसायचे. या पत्राची आठवण म्हणून जागतिक टपाल दिनी वाघोलीतील बीजेएस महाविद्यालयात पत्रलेखनाचा एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डद्वारे पत्र लिहून, शिक्षकांप्रती असणाऱ्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
जागतिक टपालदिनी अनोखी उपक्रम
देशभरात जागतिक टपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. भारतीय डाक पुणे शहर पूर्व विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम आयोजित करुन डाक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. (Wagholi News ) येथील बीजेएस महाविद्यालयात पत्रलेखनाचा उपक्रम घेण्यात आला. पोस्टमन गवळी यांनी एक हजार विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड देऊन शिक्षकांप्रती असणाऱ्या आपल्या भावना पत्राद्वारे व्यक्त करण्यास सांगितल्या. गवळींच्या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करत प्राचार्य भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आपल्या लाडक्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी एक हजार पत्रे लिहिली.
आज आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतंय या कल्पनेने विद्यार्थी हरखून गेले होते. विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. (Wagholi News ) या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य भंडारी, शिक्षक वृंद, पोस्टाचे अधिकारी गणेश खेडकर, जमीर इनामदार आणि पोस्टमन नामदेव गवळी उपस्थित होते.