केडगाव / संदीप टूले : दौंड जंक्शन व तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्नांवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दौंड जंक्शनला भेट दिली. यावेळी प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन आमदार राहुल कुल यांनी त्यांना दिले.
रविवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भाजप तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, रेल्वेचे संबंधित अधिकारी, रेल्वे प्रवासी संघटना, कार्यकर्ते, प्रवासी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी पुणे-दौंड दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या मागण्या संदर्भात आमदार राहुल कुल यांनी
रेल्वेबाबतच्या समस्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी, दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलद सुरु करण्यात यावे.
खुटबाव येथील रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाण पूल उभारण्यात यावा.
याशिवाय, कडेठाण व कानगाव येथे सुरु असलेल्या RUB चा कामाच्या ठिकाणी असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता कडेठाण व कानगाव येथे रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात यावेत, दौंड-पुणे मार्गादरम्यान मेमू ट्रिपची वारंवारता वाढवावी, ०१५२२/दौंड – हडपसर डेमू गाडी पुण्यापर्यंत चालवावी,
11421/11422 – हडपसर – सोलापूर डेमू एक्सप्रेसला मांजरी, यवत, खुटबाव, कडेठाण आणि पाटस स्थानकांवर थांबा मंजूर करावा, यांसह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या
दरम्यान, सर्व मागण्यांबाबत रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.